



पुणे: छावा सिनेमा पुन्हा एका वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुकीचा इतिहास दाखवून आपल्या घराण्याची बदनामी केल्याचा आरोप राजेशिर्के घराण्याने या सिनेमाच्या दिग्दर्शकावर केला आहे.
छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करूअसा इशारा राजेशिर्के घराण्याने दिला आहे.
पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं. पण, त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
छावा सिनेमात संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के औंरगजेबाला देतात. त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि 40 दिवस अन्ववित अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात येते. दरम्यान, संभाजी महाराज मुघलांना सापडतात, याचा संपूर्ण कट गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून रचण्यात आला, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलं आहे. याच प्रसंगावर राजेशिर्के घराण्याने आक्षेप नोंदवले असून त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.