



Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून डोंबिवली स्थानकात उतरता न आल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. इतर प्रवाशांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
बुधवारी सकाळी कल्याणकडून दादरकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून शेख जिया हुसेन (१९) प्रवास करीत होता. डोंबिवली स्थानकात पोहोचण्यापूर्वी आपण जलद लोकलमध्ये असल्याने ती मुंब्रा स्थानकात थांबणार नसल्याचे त्याच्यालक्षात आले. त्यामुळे तो डोंबिवली स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, एका प्रवाशाला धक्का लागून वाद सुरू झाला. त्यातच धक्काबुक्की होऊन हुसेनला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यावर संतापलेल्या हुसेनने खिशातील चाकू काढत प्रवाशांवर हल्ला केला. यामध्ये अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी जखमी झाले. यानंतर काही प्रवाशांनी हुसेनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.