सन २००४ मध्ये महाराष्ट्र शासनाने शिरसोली येथील नदीच्या किनारी असलेल्या स्वयंभू शंभो महादेवाच्या मंदिर क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
Follow us on



दापोली: दापोली तालुक्यातील शिरसोली या गावी सालाबाद प्रमाणे महाशिवरात्र उत्सव सोहळा बुधवार दिनांक. २६.२.२०२५ रोजी संप्पन्न होत असून भाविकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून स्वयंभू शंभू महादेवांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील निसर्गरम्य परीसरात शिरसोली येथे नदीच्या किनारी हे स्वयंभू शंभो महादेवांचे मंदिर आहे. येथे १९७४ मध्ये सतत ३ वर्ष महादेवांच्या दर्शनासाठी गंगामाता अवतरली होती. त्या वेळी दूर दूर वरून भाविक या पवित्र स्थानाला भेट देत असत.
गेली २४ वर्ष अविरत शिवपार्वती दिंडी मंडळामार्फत अनेक शिवभक्त मुंबई ते शिरसोली पायीवारी करतात. यावर्षी दिनांक २२-०२-२५ पासून शिवपार्वती दिंडी मंडळाने मुंबई ते शिरसोली पायी वारीचे आयोजन केले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी शंभूच्या दर्शनासाठी भाविकांचा सकाळपासूनच ओघ सुरू असतो. मुंबईवरून निघालेल्या दिंडीवारीचे सकाळी १०.३० वाजता स्वागत करून देऊळवाडी येथील ग्रामदेवतेची गादी असलेल्या घरातून देवाच्या वारीची सुरुवात केली जाते. ही देववारी आणि मुंबईतून आलेली वारी एकत्रीतरित्या मोठ्या भक्तीभावाने ग्राम दैवत आसलेल्या भैरी भवानीच्या मंदिरात जाते व तिथून गावच्या मध्यभागातून भक्तीमय वातावरणात शिवशंभूच्या मंदिरात पोहोचते. शिवमंदिरात पोहचताच *हर हर महादेव* या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून जातो. दिंडी सोबत आलेल्या भाविकांसह सर्व भाविक शिवशंभुचे दर्शन घेतात. शिवशंभूचा आशीर्वाद मिळाल्याने प्रसन्न मुद्रेने सर्व भाविक आनंदाने मंदिराबाहेर पडतात .
मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळच शिवशंभूचा तीर्थप्रसाद सर्वांना दिला जातो. तसेच आलेल्या सर्व भाविकांना मंडळामार्फत फराळी चिवडा व कोकम सरबत दिले जाते.
दिनांक २६/२/२५ रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी स्वयंभू शंभू महादेवांच्या मूर्तीवर सकाळच्या नित्य पूजेनंतर मंत्रोच्चारात अभिषेक करण्यात येतो.
महादेवाचा अभिषेक संपन्न झाल्यानंतर साधारणता १२.३० च्या दरम्यान मंदिरासमोरील टेकडीवर गोसावी मठामध्ये गोसावी देवांचे पूजन केले जाते तेथेही सर्व भाविक गोसावी देवांचे दर्शन घेतात.
गोसावी मठातून पूजन करून आल्यानंतर साधारण १.३०च्या दरम्यान शंभो महादेवांची महाआरती करण्यात येते. त्यानंतर दिवसभर मंदिराच्या सभामंडपात स्थानिक भजन मंडळ देवाचे नामस्मरण करत असतात. दिवसभर महादेवांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा ओघ सुरूच असतो.
रात्रौ ८ नंतर मंदिरात रात्रभर वारकरी संप्रदायाच्या नामांकित दिंड्या येऊन हरिनाम करत महाशिवरात्रीचा जागर सुरू होतो. कोकणातील विशेष वाद्य आसलेल्या खालु बाज्याने प्रत्येक दिंडीचे स्वागत करुन हरिनामाला सुरुवात केली जाते.
या उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या परिसरात एक दिवसाची बाजारपेठ स्थापून विविध दुकानदार आपल्या मालाची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करीत उत्सवाची शोभा वाढवतात.
दिनांक २७/२/२५ रोजीच्या पहाटे होणाऱ्या काकड आरती मध्ये सर्व महिला पुरुष, वारकरी बेभान होऊन वारकरी ठेक्यावर तल्लीन होतात.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २७/२/२५ सकाळी येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिराच्या सभामंडपात महाप्रसाद वाढून या भव्य दिव्य सोहळ्याची सांगता होते.
दापोली तालुक्यातीलच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यांतील हजारो भाविक या उत्सवास येतात. तालुक्यातील एक मोठा शिस्तबद्ध, नियोजित उत्सव म्हणून या महाशिवरात्र उत्सवाकडे पहिले जाते. हा उत्सव जास्तीतजास्त कसा उत्तम होईल यासाठी शिवशंभोचे भक्त, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, भक्त गण हे सर्व जवळ जवळ 2 महिन्यापासून तयारीत असतात. अतिशय उत्साहात, जल्लोषात, भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र उत्सव साजरा होतो. हजारो भक्तगण या उत्सवाला प्रचंड गर्दी करताना दिसून येतात. सर्व भक्तांच उत्तम सहकार्य व महाप्रसादासाठी अर्थिक मदत या उत्सवाला मिळते, सर्व भक्तगणांनी यावर्षीही महाशिवरात्र उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती महाशिवरात्र उत्सव मंडळ शिरसोली (मुंबई/स्थानिक) यांच्यातर्फे करण्यात आली आहे.