



Konkan Railway:होळीला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मात्र या गाड्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे होळीला कोकणात गावाला जाणार्या कोकणकरांसाठी या गाड्यांचा खूप कमी फायदा होणार असल्याने प्रवासी संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या विशेष गाड्या पैकी गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव ही गाडी दिनांक ६ आणि १३ (मध्यरात्री) आणि गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी – मडगाव ही गाडी दिनांक १३ आणि २० या तारखांना रात्री सोडण्यात येणार आहे. १३ मार्च या दिवशी होळी असताना त्याच दिवशी रात्री सोडण्यात येणार्या गाड्यांचा उपयोग काय? ६ ते २५ मार्च सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असताना ह्या आठवडी विशेष गाड्या त्याही रात्रीचा प्रवास असणाऱ्या, गोव्यात जाणाऱ्या गाड्यांचा महाराष्ट्राला काय लाभ असा प्रश्न अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विचारला आहे. तसेच होळी दरम्यान मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी दिवसा आणि मुंबई सावंतवाडी रात्री अशा किमान तीन दैनिक गाड्यांची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या गाड्यांना सेकंड स्लीपर या श्रेणीच्या डब्यांपेक्षा एसी श्रेणीचे डबे जोडले आहेत. गाडी क्रमांक ०११५१ /०११५२ मुंबई सीएसएमटी – मडगाव या गाडीला तब्बल १० थ्री टायर एसी श्रेणीचे आणि मात्र ४ स्लीपर श्रेणीचे डबे जोडले आहेत. त्यामुळे या गाड्या कोकणातील प्रवाशांसाठी न चालविता गोव्यासाठी चालविण्यात आल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.
चौकट
मुंबई – सावंतवाडी,मुंबई -रत्नागिरी,मुंबई -चिपळूण ह्या गाड्या होळी दरम्यान चालवणे सोयीचे आहे.त्यामुळे कोकण रेल्वेला विनंती आहे की कोकणवासियांचा सोयीनुसार गाड्या सोडण्यात याव्यात,किंवा गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणारा फॉर्म्युला होळी दरम्यान चालवावा ही विनंती. – कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी
होळी १३ तारखेला…. आणि गाड्या सोडल्या आहेत ६ आणि १३ तारखेला होळीदिवशीच….९,१०,११,१२ तारखेला होळीसाठी गाड्यांना वेटींग आहे तेव्हा एकही स्पेशल गाडी नाही सोडली…रेल्वेचे अजब लाॅजीक– श्री गणेश चामणकर
होळी स्पेशल आणखी काही रेल्वे गाड्यांची प्रवासी संघटनांची मागणी आहे. कोकण रेल्वे मार्गावर मार्च ते जून दरम्यान वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ह्या जादा रेल्वेना १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी.–वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना
पश्चिम रेल्वेवरून कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या जास्त आहे त्यासाठी ०९०५७/५८ ही उधना मेंगलोर एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी. – श्री यशवंत जडयार,