



ठाणे: दिवा मुंब्रा कळवा दरम्यान नव्याने टाकण्यात आलेल्या नवीन पाचव्या आणि सहाव्या अप आणि डाऊन जलद उपनगरीय रेल्वे मार्गावर असलेल्या वळणांमुळे या मार्गावरून जाणार्या लोकल गाड्या मोठे हेलकावे खात असल्याने अपघात होण्याच्या शक्यता कित्येक पटीने वाढली असून याबाबत अनेक प्रवाशांनी आवाज उठविला आहे.
दिवा मुंब्रा कळवा हा भाग अत्यंत गर्दीचा मानला जातो. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्स मध्ये येथून जाणार्या गाड्यांत तर जीवघेणी गर्दी असते. दिवा मुंब्रा कळवा या नव्याने टाकलेल्या रूळांवर जलद गाड्या चालविल्या जात आहेत. या मार्गावर काही वळणे असून येथून जाताना गाड्या मोठ्या प्रमाणात हेलकावे खातात आणि एका बाजूने झुकत असतात. त्यामुळे गर्दीमुळे गाड्यांच्या दरवाजात उभे असलेले प्रवाशांवर भार येवून ते बाहेर फेकले जात आहेत. या कारणाने बरेच प्रवासी खाली पडून जखमी झाले आहेत तर काहींनी आपला जीवही गमावला आहे. गेल्या वर्षी ठाणे रेल्वे पोलीस स्थानकात एकूण ठाणे विभागात ६८ प्रवाशांनी अपघातात जीव गमावल्याची नोंद आहे. ठाणे रेल्वे पोलीस विभागात ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा आणि ऐरोली ही स्थानके समाविष्ट आहेत. कळवा, दिवा, मुंब्रा या स्थानकांदरम्यान जास्त अपघात झाल्याची नोंद आहे.
प्रवाशांनी याबाबत आवाज उठविला असून या मार्गाची पुन्हा तपासणी करावी आणि अपघाताला कारणीभूत असलेली वळणे काढून टाकावी अशी मागणी केली आहे.
प्रवासी काय म्हणतात?
मी अंबरनाथ ते दादर असा प्रवास नेहमी जलद गाडीने करतो. गाडी अंबरनाथवरुन सुटत असल्याने मला दरवाजात उभे राहण्याचा प्रश्न येत नाही. मात्र दिवा ते ठाणे दरम्यान गाडी खूप हेलकावे घेते. हे हेलकावे एवढे मोठे असतात की आधार न घेता प्रवासी नीट उभा राहू शकत नाही. यावरून दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशांच्या स्थितीचा अंदाज येतो. – श्री. चिन्मय राणे, अंबरनाथ
प्रवासी संघटनेचे सदस्य सुभाष गुप्ता म्हणाले, “रेल्वे अपघात मॉनिटरिंग समितीने या समस्येवर चर्चा केली पाहिजे, ज्याने या प्रकरणाची चौकशी करून योग्य सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या जोडणीनंतर ट्रॅक अपग्रेड केल्यापासून तक्रारी आहेत. ट्रॅक वळवल्यामुळे समस्या वाढली आहे. रेल्वेने संरेखनाची पुन्हा तपासणी करावी आणि काही अडचण आल्यास वेग मर्यादा घालावी.”
रेल्वे प्रशासन काय म्हणते?
रेल्वेला उपलब्ध झालेल्या जमिनीनुसार या मार्गाची रचना केलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल्वे मार्गावर वळणे घ्यावी लागली आहेत. ही वळणे पूर्णपणे काढणे सध्या तरी शक्य नाही असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.