



वाडा: तरूण मंडळ उचाट आयोजित दिवंगत आधार स्तंभांच्या स्मरणार्थ ३८वा क्रीडा महोत्सव – समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५, सर्व पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थ यांच्या उत्तम आयोजन, नियोजनामुळे यशस्वीपणे पार पडली.
स्पर्धेत सहभागी २२ संघानी आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करून क्रीडा रसिकांची मने जिंकली. उपांत्य फेरीत वाघजाई कोळकेवाडी संघाने प्रतिस्पर्धी कळकवणे क्रीडा मंडळास पराभुत करून तर केदारनाथ कोयनावेळे संघाने प्रतिस्पर्धी कादवड क्रीडा मंडळास पराभुत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात केदारनाथ संघाने उत्तम बचाव करत मध्यंतरापर्यत ५ गुणांची आघाडी घेत सामन्यात रंगत आणली. दुसऱ्या सत्रात पवन मोरे, ओमकार कदम, निखिल, किरण, विपुल यांच्या बहारदार खेळाने आघाडी १० गुणांनी वाढविण्यात केदारनाथ संघ यशस्वी झाला. वाघजाई कोळकेवाडी संघाच्या आदित्य शिंदे व श्रीपाद कुंभार यांनी यशस्वी सुपर टॅकल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली पण अंतिम सामन्यात चढाईपटु आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात कमी पडल्याने वाघजाई संघाला उपविजेपदावर समाधान मानावे लागले तर केदारनाथ संघाने चढाई व सर्वोत्तम बचावाचा जोरावर समाजस्तरीय स्पर्धेतील सलग दुसऱ्या अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली.
केदारनाथच्या ओमकार कदम सुरेख सुंदर अष्टपैलु खेळाचे प्रदशर्न करीत सर्वोत्तम खेळाडु तर वाघजाईच्या साईराज कुंभार सर्वोत्तम चढाईपटु व प्रोस्टार आदित्य शिंदे सर्वोत्तम पक्कडपटू होण्याचा मान पटकावला. जय भवानी क्रीडा मंडळ टेरव या संघास शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रीय खेळाडू सुशील ब्रीद, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, ठाणे शहर रा. काँ. (शरद पवार गट) अरविंदराव मोरे, संयोजक कोकण पदवीधर प्रकोष्ठ भाजपा सचिनराव मोरे, दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुणराव शिंदे, उचाट शिक्षण संस्था अध्यक्ष प्रभाकरराव मोरे, अशोक बुवा मोरे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.