



चिपळूण : पुणे येथून चिपळूणला येत असताना कुंभार्ली घाटातील काळकडा येथील अवघड वळणावरून कार 500 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रविवारी रात्री घडली. मात्र मंगळवारी दुपारी मोबाईल लोकेशनमुळे हा अपघात उघडकीस आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की विश्वजित जगदीश खेडेकर (40) आपल्या मातोश्री सुरेखा जगदीश खेडेकर (70) आणि आपल्या पत्नी समवेत रविवारी चिपळूणला काही कामानिम्मीत निघाले. वाटेत विश्वजितने आपल्या पत्नीला सातारा येथे माहेरी सोडून तो आईला घेऊन चिपळूणकडे निघाला. वाटेत रात्री पाटणजवळ जेवणही केले. विश्वजितच्या पत्नीने या दोघांनाही वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजितचा मोबाईल बंद होता, तर सासू सुरेखा यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. शेवटी त्यांच्या पत्नीने जिथे ते जाणार होते तेथे फोन करून विचारणा केली. मात्र तिकडे कुणी पोहोचले नसल्याचे समजले.
वाटेत काही तरी विपरीत घडले असावे असा संशय त्यांना आला आणि त्यांनी पोलिसांची मदत मागितली. पोलिसानी दोघांचेही मोबाईल लोकेशन तपासले असता ते कुंभार्ली घाटात आढळून आले. त्यानंतर पोलीस, ग्रामस्थांसमवेत घाटात येऊ पाहणी सुरू केली. याचवेळी काळाकडा येथून कार घसरत गेल्याचे दिसून आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 500 फूट दरीत कार सापडली. त्यामध्ये दोघेही मृतावस्थेत आढळले. रात्री क्रेनच्या माध्यमातून दोन्ही मृतदेहांसह कार दरीतून बाहेर काढण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमानेंसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.