होळीसाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाण्याचा बेत आहे? मग ही बातमी वाचाच…

   Follow us on        
Mumbai Goa Highway: कोकणातील दुसरा मोठा सण म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सवास अगदी काही मोजकेच दिवस शिल्लक आहेत. पुढील आठवडय़ात मुंबई पुण्याहून चाकरमानी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघतील. कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गचा पर्याय निवडणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी सध्या या महामार्गाची परिस्थिती कशी आहे याबाबत अभ्यास करून मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार बहुतेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

समितीचा अहवाल काय सांगतो ?

मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील १७ वर्षांपासून रखडलेले असून सद्याची कामाची परिस्थिती अत्यंत बिकट असून धीमी गतीने काम चालु आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतची मुदत राज्य सरकार कडून वाढवून मागण्यात आली होती व आता डिसेंबर  २०२५ कामाची डेडलाईन देण्यात आलेली आहे. परंतु सद्यस्थितीत कामाची प्रगती पाहता दिलेल्या तारखेला देखील महामार्ग होणार नाही हे आमचे मागील ०६ वर्षाचे अनुभव आहेत व जनआक्रोश समितीने २० फेब्रुवारी २०२५,२२ व २३ मार्च २०२५ आणि ०१ व ०२ मार्च २०२५ रोजी केलेल्या पाहणीनुसार अधोरेखिल केले आहे. कारण २०१९ साली मा.श्री.चंद्रकांत पाटील साहेब यानी महामार्गाची डेडलाईन दिलेली होती,यानंतर मा.श्री.अशोक चव्हाण साहेब यानी २०२० पर्यंत काम पूर्ण करू असे आश्वासन दिले होते यानंतर मा.श्री.रविंद्र चव्हाण साहेब यानी ०४ वेळा डेडलाईन दिली व आता नव्याने दिलेली डेडलाइन सुद्द्धा एक आश्वासन आहे हे महामार्गाची परिस्थिती पाहता लक्षात येत आहे व आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत.
टप्पा-०१ पनवेल ते कासु -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती.  सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे.तर अद्यापही साईट पट्टी,दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे,ड्रेनेज लाईन,सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व  सदर टप्प्यात  ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत.सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु  अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
टप्पा-०२ कासु ते इंदापुर -४२ किमी ते ८४ किमी  (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत  काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती.सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे.अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही.कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे.महामार्गाला पेव्हर ब्लॉकदिसत आहेत.सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे,जनावरे,वहानांसाठीभुयारी मार्ग,साईटपट्टीचे काम बाकी आहे तर  अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही.या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे.याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहेत.सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखडयानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत.तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्यांची जमीन नुकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापुर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे  अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे.सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत कोकणकर संभ्रमात आहेत. सदर  ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडण्यात येणार आहेत अशी माहिती मिळत असून याबाबत काय नियोजन आहे याची माहिती मिळावी.आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५  किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यासाठी स्थानिकांच्या मागणीनुसार अवजड वाहतूक ईतर मार्गाने वळविणे व माणगाव बायपास आहे त्या स्थितीत वापरण्यास देणे अशी मागणी होत आहे.
लोणेरे येथील ब्रिजचे काम एप्रिल-मे पर्यंत पूर्ण करण्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे परंतु ०२ महिन्यात कशा पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार आहे याचा आराखडा मिळावा जेणेकरून त्यानुसार काम चालु आहे का याची पाहणी कोकणकरांच्या वतीने जनआक्रोश समितीकडून करण्यात येईल.
टप्पा-०४-वडपाले ते भोगाव(११० किमी ते १४९ किमी)
सदर टप्प्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामे करण्यात आलेली आहेत.महाड मधील टोल जवळील आंबेतकडे जाणाऱ्या अंडरपास धोकादायक आहे.याठिकाणी सर्व्हिस रोडचे तीन मार्ग खुले असून एक मार्गाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. सदर ठिकाणी फ़ॉरेस्ट डिपार्टमेंटचा अडथळा असल्याचे स्थानिकांकडून कळाले. परंतु शासनाच्या अंतर्गत वादामुळे अनेक अपघात सदर ठिकाणी घडत आहेत. महाडकडे वाहनांना जायचं झाल्यास उलट बाजूने महामार्गांवर प्रवेश करावा लागत आहे.
प्रत्येक गावाजवळ अंडरपास देणे अपेक्षित होते कारण महामार्गाच्या अलीकडे गाव तर पलीकडे शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय, शेती असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्ग ओलांडताना अनेक अपघात घडत आहेत यामध्ये चांभारखिंड येथे अंडरपास तर पोलादपूर येथे स्कायवॉल्क असणे गरजेचं आहे.
टप्पा-०५ – भोगाव १४९ किमी ते कशेडी १६१ किमी –
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळाली व सदर परिस्थिती अद्यापही तशीच आहे.तर दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर  २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे.
टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी-  
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिति बिकट आहे,सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे.सदर ठिकाणी ०२ मार्च २०२५ रोजी पाहणी करण्यात आली असता अद्यापही बरेचसे काम बाकी आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा मिळावा व या पावसाळ्यात नेहमीप्रमाणे संरक्षण भिंत कोसळणार नाही यासाठी कोणते नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहेत याबाबत आवगद करावे.
टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी  ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळून येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम चालु आहे.महामार्गावर एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना अद्यापही सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. सूचना फलक नसल्याने व पूर्वसूचना न देता अचानक कुठेतरी कामाला सुरुवात केल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे.
टप्पा-०८ व ०९ -आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेला आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिति दर्शवीत आहोत.तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
लांजा-
लांजा शहरांत उड्डाणपुलाचे काम चालु असून अंदाजित ०३ ते ३.५ किमी लांबीचे हे उड्डाणपुल आहे. सदर उड्डाणपुलामुळे शहराचे दोन भाग होत आहेत. यामुळे सदर उड्डाणपुलाचे काम ४५० मी ते ५०० मिटरने वाढविल्यास प्रशासकीय कार्यालय,शाळा यांना एकत्रित जोडले जाईल. तसेच या उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालु असून दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड किमान प्रवासासाठी डांबरी असावेत जेणेकरून प्रवासाला अडथळे निर्माण होणार नाहीत परंतु मातीचा रोड असल्याने धुळीचा सामना स्थानिकांना करावा लागत आहे. यावर पाणि मारणे हे उपाय नसून सदर सर्व्हिस रोड किमान डांबरी करावेत.
देवधे-
देवधे येथे देखील गाव अलीकडे तर शाळा,शेती पलीकडे असल्याने सदर ठिकाणी देखील अंडरबायपास असणे आवश्यक आहे. तसेच ईतर गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने जलद गतीने महामार्गांवर वाहनांचा प्रवेश होतो परिणामी अपघात घडू शकतात सदर ठिकाणी सर्व्हिस रोडचे काम चालु असून ०५-०६ फुटाचे खड्डे मारले असून सुरक्षेच्यादृष्टीने काहीही काळजी घेण्यात आलेली नाही. रात्री अपरात्री सदर ठिकाणी अपघात घडू शकतो.
चरवेली –
सदर गावाला अंडरपासची आवश्यकता आहे. सदर ठिकाणी काम पूर्ण झालेला असून महामार्ग लगत अंडरपास किंवा बॅरिकेट नसल्याने गुरे रस्त्यावर येत असतात यामूळे सतत अपघात घडत आहेत. १५ दिवसापूर्वीच वाहनाच्या धडकेत ०२ बैल अपघातात मृत्युमुखी पडले तर वाहन चालकाचा अतिशय नुकसान झाला आहे. बस स्टॉप,शेती यांसारख्या कामासाठी महामार्ग ओलांडताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
पाली –
पाली येथील उड्डाणपुलाचे फक्त खांब उभे करण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी ०१ व ०२ मार्च रोजी पाहणी केली असता ०१ JCB व ०४ कामगार काम करताना दिसत आहेत. जर काम अशाच पद्धतीने चालु राहिल्यास सदर उड्डाणपुल पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती नाही.हे काम कशा पद्धतीने व किती महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा मिळावा.
हातखांबा-
हातखांबा येथे देखील उड्डाणपुलाच्या कामाची गती अतिशय धिमी आहे. ठेकेदाराला मनुष्यबळ व यंत्रणा वाढविणे अपेक्षित आहे. हातखांबा येथील गुरववाडी येथे महामार्ग हा ०६ फूट उंच असून गुरववाडी गावातील जोडणारा रस्ता ०६ फूट खोल असल्याने या महामार्गांवर प्रवेश करणे कठीण आहे यासाठी सदर उतार किमान ५०० मिटर पासून केल्यास गावातील रस्ता व महामार्ग समान अंतरावर येतील.याठिकाणी ठळक दिशादर्शक फलक नसल्याने मुंबईतून येणारा पर्यटक गोवा येथे जाण्याच्या बदल्यात थेट कोल्हापूर येथे पोहचेल कारण सर्वच ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.
निवळी-
निवळी येथे होत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची अशीच परिस्थिती आहे. सदर उड्डाणपुल बाजारपेठेत उतरत असताना खांब असणे अपेक्षित असताना भराव टाकल्याने महामार्गावर बाजारपेठेत दूतर्फा परिस्थिती निर्माण होत आहे.सदर उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण करण्यात येईल याबाबतचा आराखडा मिळावा.
बावनदी उड्डाणपुल –
सदर कामाला गती दिसत असून अशाच पद्धतीने काम चालु राहिल्यास लवकरच पूर्ण होऊ शकतो. स्थानिक व सदर ठिकाणी काम करीत असलेल्या कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते मे पर्यंत काम पूर्ण होण्याचा कालावधी सांगण्यात येत आहेत.या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा आराखडा व दिवसाला प्रत्यक्षात होत असलेला काम याबाबतचा (DPR – DAILY PROGRESS REPORT) मिळावा.
वांद्री अंडरपास-
वांद्री येथे अंडरपासच्या कामाला ०८ दिवसापूर्वी सुरुवात करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी दिनांक- ०२ मार्च रोजी पाहणी केली असता हे काम यावर्षी पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. अद्यापही अंडरपास व महामार्गाचे काम बरेचसे बाकी आहे.यामुळेच यंत्रणा वाढवून कामाला गती देण्यात यावी.
संगमेश्वर उड्डाणपुल-
सदर उड्डाणपुलाचे काम अतिशय धिम्या गतीने चालु असून ०४ कामगार काम करीत आहेत.सदर ठिकाणी स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर दररोज अशाच पद्धतीने काम चालु आहे असे सांगण्यात आले.
संगमेश्वर येथे अगदी सकाळपासून ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे. सावित्री नदीवरील पुल जर ०६ महिन्यात पूर्ण होऊ शकतो तर संगमेश्वर मधील उड्डाणपुलाचे काम का होऊ शकत नाही असा प्रश्न स्थानिकांचा आहे. तरी या ठिकाणी यंत्रणा वाढवून या ०३ महिन्यात काम पूर्ण करण्यात यावा किंवा किमान ०१ बाजू चालु करण्यात यावी.
आरवली-
आरवली येथे सर्व्हिस रोडचे काम चालु असून ०५-०६ फूट खोल ड्रेनेज लाईन खोदकाम करण्यात आलेले आहे. परंतु याठिकाणी सुरक्षा वाऱ्यावर असून आतापर्यंत ०३ अपघात झाले आहेत.
वर दर्शविल्याप्रमाणे महामार्गाची स्थिती असून सुरक्षा,दिशादर्शक फलक यांची कमतरता आहे.तसेच वरील टप्प्यात चाललेल्या कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव,कामाचा कालावधी , सुरक्षा अधिकारी संपर्क व ठेकेदार यांचा संपर्क असावा हि आपणास विनंती.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search