सिंधुदुर्ग: असनिये गावात कणेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका घराच्या आवारात कुत्र्याचा जंगली प्राण्याने फडशा पडला असल्याची घटना समोर आली आहे. हा जंगली प्राणी पट्टेरी वाघ असल्याचे ग्रामास्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे असनिये परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कणेवाडी येथील दिनेश सावंत यांच्या घरातील कुत्रा रात्री अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा माग काढला असता त्याला घराच्या आवारात पटेरी वाघाच्या पायाचे अनेक ठसे मिळाले. या परिसरात पट्टेरी वाघ अनेक वेळा ग्रामस्थांना दृष्टीस पडत असून हा बिबट्या नसून पटेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी या पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे ही टिपले. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी आणि लाकडांसाठी जंगलात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
पट्टेरी वाघ कि बिबट्या?
दरम्यान याबाबत निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक तसेच बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी टिपलेले हे ठसे पट्टेरी वाघाचे नसून ते बिबट्याचे आहेत. तसेच वाघ जंगलातून भर वस्तीत येऊन शिकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा बिबट्या असल्याचे सांगितले.
Facebook Comments Box