



Konkan Railway 07:45 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
Konkan Railway 06:15 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.
आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm)
सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.