मुंबई :मुंबई रेल्वे विकास महामंडळाने ‘एमयूटीपी ३ ब’मध्ये पनवेल-वसई उपनगरी रेल्वे प्रकल्पाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता पनवेल-वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली- विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे. बोरिवली आणि विरार परिसरातील नागरिकांना पनवेल गाठण्यासाठी आता थेट मुंबई उपनगरी रेल्वे अर्थात मुंबई लोकल उपलब्ध होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या ‘एमयूटीपी ३ ब’ प्रकल्पसंचामध्ये नवीन पनवेल-वसई उपनगरी रेल्वे मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. वसईपासून पुढे बोरिवली आणि विरार अशा दोन्ही दिशांना याची जोडणी असणार आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी सांगितले आहे.
‘एमयूटीपी’अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रेल्वे प्रकल्पात राज्य आणि केंद्र सरकारकडून ५०:५० प्रमाणे निधी दिला जातो. नवीन पनवेल-वसई लोकल मार्ग सुरू करण्याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत राज्य सरकारशी प्राथमिक बैठका पार पडल्या आहेत. महामुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद करणाऱ्या या प्रकल्पाला राज्य सरकारकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच अंतिम बैठका घेऊन नवीन रेल्वे प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही वाडेकर यांनी सांगितले.
Facebook Comments Box