



नवी दिल्ली: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात वाढ केली आहे. खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.
संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक नोटिफिकेशन काढले. या नोटिफिकेशननुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर, दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २,५०० रुपये झाला आहे.
खासदारांच्या पगारात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. याआधी,एप्रिल २०१८ मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता.