



सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.