



रायगड: मुंबई गोवा महामार्गावर उद्या १२ एप्रिल रोजी खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भातील वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रम १२ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आला आहॆ. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिवभक्त किल्ले रायगडावर येण्याची शक्यता आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यास माणगाव, इंदापूर, कोलाड पट्ट्यात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या संदर्भातील वाहतूक बदल अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आली.
यानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारपाडा ते कशेडी पर्यंत १२ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून दुपारी ३ वाजे पर्यंत सर्व प्रकारची जड आणि अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या अधिसूचनेतून दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका यांना वगळण्यात आली आहेत असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.