



सावंतवाडी: निसर्गरम्य कोकणातील सावंतवाडी शहर हे नेहमीच पर्यटनासाठी ओळखले जाते, येथील गंजिफा, लाकडी खेळणी ही देशातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध आहेत. या शहराच्या जवळच असणारे शिरोडा बीच, आंबोली हिलस्टेशन, वेंगुर्ला बंदर ई. तसेच धार्मिक स्थळे ही देशभरात प्रसिद्ध आहेत, म्हणूनच संस्थानकालीन वारसा असणाऱ्या या ऐतिहासिक शहराला कोकण रेल्वे जोडली गेल्याने या शहराची ओळख ही संपूर्ण देशात पसरली.
तळकोकण म्हणजे कोकणातील दक्षिणेकडील भाग त्यात प्रामुख्याने दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी हे प्रमुख तालुके गणले जातात. या भागात रेल्वेने जायचे असल्यास सावंतवाडी रेल्वे स्थानक हे या भागातील प्रमुख स्थानक, जे सावंतवाडी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानकात २०१५ साली तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार श्री दीपकभाई केसरकरजी आदींचा उपस्थितीत रेल्वे टर्मिनस होण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले. परंतु आजतागायत टर्मिनस प्रती असणारी राजकीय इच्छाशक्ती आणि कोकण रेल्वे महामंडळाची सावंतवाडी प्रति असणारी सापत्निक वागणूक ही परिपूर्ण टर्मिनस न होण्यामागची कारणे असावीत असे सध्याच्या परिस्थिती नुसार दिसत आहे. परंतु असे असताना प्रवासी वर्ग मात्र या स्थानकातून रेल्वे महामंडळाला कोटींच्या घरात उत्पन्न मिळवून देत आहे असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे वार्षिक उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे होते, आणि या स्थानकातील एकूण प्रवासी संख्या ही ७ लाख ७९ हजार इतकी होती, याचा अर्थ असा की प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर आपल्या प्रवासासाठी केला. यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १६ कोटी १६ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ ही १०.९२ टक्के एवढी आहे. या आर्थिक वर्षी या स्थानकाचा वापर एकूण ७ लाख ९९ हजार ७२७ म्हणजेच जेमतेम ८ लाख प्रवाशांनी केला. मागच्या वर्षीचा तुलनेत ही वाढ ४.५७ टक्के एवढी आहे. एकूण सरासरी प्रवासी संख्या ही प्रतिदिन ५७ ने वाढून २१९१ एवढी झाली आहे.
वरील माहितीद्वारे एवढे नक्की आहे की सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक हे उत्पन्नाचा बाबतीत सरस आहे. असे असून देखील कोकण रेल्वे महामंडळ या ठिकाणी प्रवाश्यांना हव्या त्या सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न येथील प्रवाशांना नक्की पडत आहे,
म्हणूनच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या प्रवासी संघटनेने गेल्या वर्षभरात अनेक आंदोलने केली, भेटी गाठी घेतल्या, पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून या स्थानकात वांद्रे – मडगाव द्विसाप्ताहिक एक्सप्रेस चा थांबा आणि नागपूर – मडगाव एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत केला गेला, याठिकाणी पीआरएस सुविधा पूर्णवेळ करून घेतली. टर्मिनस करिता लागणारा अप्रोच रोड आता पूर्ण रूप घेत आहे. वर्षभरात येथील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एवढी कामे मंजूर करून घेतल्यानंतर देखील संघटनेने कोकण रेल्वेच्या १७ मार्च २०२५ च्या बैठकीत सावंतवाडी स्थानकात लिफ्ट, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटर लांबीची निवारा शेड, एक्झिक्युटिव लाँन्ज आणि प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म वर डिजिटल इंडिकेटर बसवण्यासाठी परिपूर्ण चर्चा केली गेली आणि ही कामे त्याच दिवशी रेल्वे अधिकाऱ्यांनी मंजूर केली गेली. काही कामांचे टेंडर देखील निघाले आहे.
नवीन थांबे नाहीच..
सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात काढून घेण्यात आलेले राजधानी एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे अजून पूर्वरत न होणे हे या ठिकाणच्या प्रवाशांवर अन्याय नाही का असा सवाल उपस्थित होतोय. कोकण रेल्वेच्या १२ जुलै च्या पत्रानुसार या ठिकाणी काही गाड्यांचे थांबे हे कोकण रेल्वेने सावंतवाडी स्थानकासाठी मंजूर केले होते आणि तसा प्रस्ताव केंद्रातील रेल्वे बोर्डाकडे पाठवला देखील होता, परंतु रेल्वे बोर्डाने तो प्रस्ताव लालफितीत का गुंडाळला हे कोडे अजून ही सुटत नाही. कोकण रेल्वे मार्गावर इतर ठिकाणी थांबे मिळत असताना सावंतवाडी स्थानक मात्र उपेक्षितच राहिले. परंतु वरील उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता आतातरी कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे बोर्ड सावंतवाडीला न्याय देईल का अशी भाबडी आशा येथील जनतेत निर्माण झालीय.
– सागर तळवडेकर
उपाध्यक्ष – कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.