



रत्नागिरी:कोकणातून महाबळेश्वरला जाण्यासाठी आता थेट नवा मार्ग होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रांताना जोडण्यासाठी केबल स्टे ब्रिज उभारण्यात येत आहे. या ब्रिजमुळं सातारा आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. तसंच, या ब्रिजवर पर्यटकांसाठी व्ह्यूविंग गॅलरीदेखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळं सह्याद्रीतील कोयनेचे बॅकवॉटर आणि सनराइज व सनसेटही पर्यटकांना पाहता येणार आहे.
या नवीन मार्गामुळं कोयना खोऱ्यातील दुर्गम भागांना जोडणारा आहे. हा पूल साताऱ्यातील तापोळा ते पलीकडेल गाढवली आहिरपर्यंत होणार आहे. त्याच्याजवळच घाटमार्ग असून या पुलामुळं रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरचे अंतर सुमारे 50 किमीने कमी होणार आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाटमार्गे या पुलावरुन सातारा व महाबळेश्वर असा प्रवास करता येणार आहे.
मुंबईतील सीलिंकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा पूल असणार आहे. मध्यवर्ती भागात 43 मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी उभारली जाणार आहे. त्यामुळं आता रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाटमार्गाऐवजी नवा मार्ग प्रवाशांना खुला होईल. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गाने नव्या ब्रिजवरुन पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा असा प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे. त्यामुळं तापोळा ते सातारा हे अंतर 10 ते 15 किमीने कमी होईल.
Facebook Comments Box