कोकणातील शाश्वत जीवन शैलीचे महत्व देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, तळकोकणातील ‘रानमाणूस’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने आज कोकणी रानमाणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इकोटूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली. कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना प्रसाद तितक्याच परखडपणे स्थानिक प्रश्नही प्रशासनासमोर मांडतो म्हणूनच तो असामान्य ठरत आहे. त्याच्या या कार्याची दखल घेण्यात आली असून त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रोख रक्कम रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
युआरएल फाउंडेशनबाबत
उदयदादा लाड यांनी स्थापना केलेल्या युआरएल (उदयदादा राजारामशेठ लाड) फाउंडेशनतर्फे मुख्यत्वेकरून समाजातील साहित्य आणि सामाजिक कार्य करणाऱ्या निस्वार्थी व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक निधीतून हे पुरस्कार दरवर्षी वितरित केले जातात. महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पात्र सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना ‘१,००,००० (एक लाख)’ बक्षीस देण्याचा वारसा यूआरएल फाउंडेशनने सुरू ठेवला आहे.
Facebook Comments Box