



Konkan Railway: कोकणात उन्हाळी सुट्टीसाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्यांना हा प्रवास खडतर आणि त्रासदायक ठरत आहे.
अवकाळी पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून बर्याच गाड्या आपले वेळापत्रक सोडून धावत आहेत. त्यामुळे 9 ते 10 तासांचा प्रवास 13-14 किंवा त्यापेक्षा जास्त तासांवर आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस सुमारे दोन ते तीन तास उशिराने तर आठवड्यातुन चार दिवस धावणारी मडगाव – एलटीटी एक्सप्रेस उशीरा धावण्याचे आपलेच विक्रम मोडत आहे. मागच्या आठवड्यात तर दोन वेळा ही गाडी 8 ते 10 तास उशिराने (चालत?) धावत होती. या गाड्यांसाठी एकच रेक असल्याने, पेअरींग ट्रेन उशिरा आल्यास आरंभ स्थानकावरून गाड्या उशिराने सुटत आहेत. पुढे लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देवून या गाड्या अजून रखवडल्या जातात.
प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने त्रास
अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागत आहे. गाडीची घोषणा झाल्यानंतर ती गाडी येईपर्यंत प्लॅटफॉर्म वर सामान सांभाळत गाडीची वाट पहावी लागत आहे. मुसळधार पावसात दोन्ही हातात सामान घेऊन भिजत भिजत गाडी पकडावी लागत आहे. कोकणातील स्थानकांना विमानतळांसारखे स्वरूप देण्यात आले पण प्लॅटफॉर्म शेड सारख्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले गेल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.
प्रवास ‘वेटिंग’ वरच
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या गाड्यांचे कन्फर्म तिकीट भेटणे म्हणजे एक दिव्यच मानावे लागेल अशी परिस्थिती सध्या आहे. कोटा कमी, त्यात दलालांचा सुळसुळाट त्यामुळे सामान्य प्रवाशांना सहजासहजी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा परतीचा प्रवास त्यांना सामान्य कोच मध्येच करावा लागत आहे.