



गोवा: अलीकडेच सुरु झालेल्या सोलापूर ते गोवा विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच, गोव्याहून सोलापूरकडे जाणारे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आले. यामुळे विमान प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन पावसाळी सुट्ट्यांमध्ये अनेकांनी गोव्यात सहलीचे नियोजन केले होते, मात्र ही विमानसेवा ठप्प झाल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे नियोजन बिघडले
फ्लाय ९१ या विमान कंपनीला तांत्रिक कारणामुळे शनिवारी (दि.१२) रोजी संध्याकाळचे उड्डाण रद्द करावे लागले. हे विमान उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावरून ४.५ मिनिटांनी सोलापूरसाठी उड्डाण करणार होते, यांनतर तांत्रिक कारणामुळे वैमानिकांनी उशीर होणार असल्याचे जाहीर केले. मात्र पुढे ६.३० पूर्वी सोलापूरात उतरणे शक्य नसल्याने अखेर हे उड्डाण रद्द करावे लागले.
गोव्यातून सोलापूरकडे येणाऱ्या या विमानात अंदाजे ५५ ते ६० प्रवासी प्रवास करत होते. विमान अचानक रद्द झाल्याने या सर्व प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे बिघडले. विमानतळ प्राधिकरण अधिकारी अंजली शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे उड्डाण तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले असून, सर्व प्रवाशांना तिकिटाचे शंभर टक्के पैसे परत केले जाणार आहेत.
सोलापूर-गोवा ही विमानसेवा सुरू होऊन अवघा एक महिनाच झाला आहे, मात्र या कमी कालावधीत १३०० हून अधिक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला होता. अलीकडेच अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला जात असला तरी, यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे नाराजी व्यक्त होत आहे.