



Sawantwadi: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी टर्मिनसच्या कामास होत असलेल्या प्रचंड विलंबामुळे आणि कोकण रेल्वे मार्गावरील अपुऱ्या रेल्वे सेवांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. यासंदर्भात पांडुरंग चंद्रकांत मुळीक यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ११ जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. कोकण रेल्वे मार्ग पूर्ण होऊन २७ वर्षे उलटली तरी मार्गावर कोकणातील प्रवाशांसाठी पुरेश्या गाड्या नाहीत. तसेच सन २०१५ पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित असलेले सावंतवाडी टर्मिनस अजूनही अर्धवट स्थितीत असल्याकडे श्री. मुळीक यांनी या तक्रारीद्वारे पंतप्रधान कार्यालयाचे लक्ष वेधले आहे.
या पत्रात म्हटले आहे, कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या बहुतांश गाड्या दक्षिण भारत व गोव्यासाठी धावतात. उत्सव व हंगामी विशेष गाड्याही सावंतवाडी टर्मिनसपर्यंत न सोडता त्या पुढे गोवा, केरळ पर्यंत सोडल्या जातात. यामुळे कोकणातील विशेषतः सिंधुदुर्गातील रेल्वे प्रवाशांची नेहमीच परवड होते. जिल्ह्यातील
प्रवाशांना नेहमीच गर्दीतून गुरे-ढोरे कोंबल्याप्रमाणे प्रवास करावा लागतो. शिवाय शासनाच्या महत्वाकांक्षी ‘अमृत भारत’ योजनेत कोकण रेल्वे मार्गावरील एकाही स्थानकाचा समावेश नाही. सावंतवाडी टर्मिनसचे काम गेली १० वर्षे अर्धवट स्थितीत आहे. परिणामी सावंतवाडी स्थानकावर अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबे मिळत नाहीत. तरी सावंतवाडी स्थानकाचा ‘अमृत भारत’ योजनत समावेश करून सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती या पत्राद्वारे श्री. मुळीक यांनी केली आहे.
ही तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून, पंतप्रधान कार्यालयाचे अवर सचिव (सार्वजनिक) मुकुल दीक्षित यांनी ती स्वीकारली आहे. या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतली जाईल व सावंतवाडी टर्मिनसच्या विकासाला गती मिळेल तसेच कोकणवासियांना अपेक्षित रेल्वे सुविधा लवकरात लवकर मिळतील, असा विश्वास श्री. मुळीक यांनी व्यक्त केला आहे.