



Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या नियमित गाड्यांच्या आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमानी विशेष गाड्यांच्या घोषणेवर लक्ष लावून बसले आहेत. मध्य रेल्वेने गणेशोत्सव विशेष रेल्वे वाहतुकीची घोषणा सोमवारी सायंकाळी केली. मात्र अवघ्या तासाभरातच ही घोषणा मागे घेण्यात आली. घोषणा मागे घेण्याचे नेमके कारण मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
‘मध्य रेल्वे गणपती विशेष रेल्वेगाडी २०२५ भाग-एक’ असे विशेष रेल्वे गाड्या चालवण्यासाठी ‘कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक ४९०/२०२५’ मध्य रेल्वे मुख्यालयाने सोमवारी जाहीर केले. नोटिफिकेशन जाहीर करताना तीन जुलै रोजी कोकण रेल्वे विशेष रेल्वेगाडी व्यवहार्यता पत्र आणि एक जुलै रेल्वे मंडळ मंजूरी पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. गणेशोत्सवातील गर्दी विभागण्यासाठी २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विशेष रेल्वे वाहतूक करण्याचे पत्रात नमूद आहे.
चाकरमान्यांमध्ये गोंधळ
मध्य रेल्वे प्रशासनाने जरी हे पत्र रद्द केले तरी हे घोषणापत्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या गाड्यांचे एडिट केलेले मेसेज सुद्धा व्हायरल होत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांत गणपती विशेष गाड्यांबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.