



सिंधुदुर्ग: मुंबई – गोवा महामार्गावर आता गुंडाराज सुरु झालंय का? असा सवाल उपस्थित होणारी घटना राजापूर येथे घडली आहे. सात ते आठ जणांच्या टोळक्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिघांना जबरदस्तीने मारहाण करत पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महामार्गावरील डोंगर फाटा येथे गुरुवारी (१७ जुलै) रोजी ही घटना घडली.
याबाबत शशिकांत शंकर परब (६०, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) यांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. यावरुन सात ते आठ अनोळखी लोकाविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत यांचा मुलगा व मुलाचा मित्र यांच्यासोबत मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने प्रवास करत होते. डोंगर फाटा येथे आल्यानंतर एका कारने त्यांच्या कारला जोराची धडक दिली.कारने धडक दिल्यानंतर त्या कारमधून (एमएच १८ एजे ७०५६) सात ते आठजण खाली उतरले आणि त्यांनी फिर्यादी व त्यांच्यामुलासह मित्राला धमकावून मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांनी अश्लील शिवीगाळ देखील केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर संशयितांनी फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने चार हजार रुपये जबरदस्तीने घेतले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ्यात महामार्गवरील खड्यांचा होणारा त्रास आणि इतर समस्यांचा कोकणी माणूस त्रास सहन करत असताना आता गुंडगिरीचे संकट महामार्गावर पाहायला मिळत आहे.