पेंडूर (ता. मालवण) – मालवण तालुक्यातील कट्टा-नेरुरपार मार्गे कुडाळ येथे जाणाऱ्या हमरस्त्यावर, पेंडूर गावाच्या हद्दीत सुमारे १५ ते २० फूट लांबीचा एक महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसून आला. रस्त्याने जात असलेल्या गावातील वाहनचालक व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी हा अजगर प्रत्यक्ष पाहिला असून, त्यातील एका युवकाने हा क्षण मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या महाकाय सापाचे पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “कधी हा अजगर गुरांना गिळंकृत करेल की काय?” अशी काळजी शेतकऱ्यांच्या मनात आहे.
गावाच्या एका बाजूने वाहणारी कर्ली नदी, तसेच आजूबाजूच्या निसर्गसंपन्न भागामुळे यापूर्वी देखील वन्य प्राणी आढळले आहेत. काही वर्षांपूर्वी, एक भली मोठी मगर पेंडूर तलावात सापडली होती. ती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या मदतीने पकडून पुन्हा नदीत सोडली होती.
👆🏻आपला स्पॉट आजच बुक करा आणि उत्तम प्रतिसाद मिळवा
याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची मागणी आहे की, या अजगरालाही तात्काळ पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या गुरांना किंवा इतर जनावरांना धोका पोहोचणार नाही.
पेंडूर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून वनविभागाकडे या संदर्भात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.