सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:
-
गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा
-
गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा
या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.