



भोसते, खेड (ता. खेड)
खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.
ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.
या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.