



वैभववाडी : घाटातील दाट धुक्यामुळे चालकाला अंदाज न आल्याने एक आयशर टेम्पो कोसळून गंभीर अपघात झाला. कोल्हापूरहून सिमेंटचे पत्रे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जाणारा हा टेम्पो बुधवारी रात्री सुमारे ९ वाजता करुळ घाटात पलटी होऊन दरीत पडता पडता वाचला.
अपघातग्रस्त टेम्पो (एमएच ०९-एक्स ४७४७) अभिजित कांबळी चालवत होते . घाटात धुक्यामुळे एका वळणावर नियंत्रण सुटल्याने त्याने ब्रेक मारला पण टेम्पो थेट भिंतीवर आदळला आणि पलटी झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून हा टेम्पो अगदी टोकावर लटकून राहिला आणि मोठी हानी टळली. टेम्पोचा पुढचा भाग भिंतीवर आदळून निकामी झाला असून काही भाग दरीत विखुरलेला आहे. सिमेंटचे पत्रे दरीत कोसळले आहेत.
👆🏻आपला स्पॉट आजच बुक करा आणि उत्तम प्रतिसाद मिळवा
सुदैवाने या भीषण अपघातातून चालक आणि क्लिनर दोघेही थोडक्यात बचावले असून मोठ्या शिताफीने ते बाहेर पडले. चालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर गगनबावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.