चाचणी यशस्वी; सेवा लवकरच सुरू होणार
गेले काही दिवस प्रतीक्षेत असणारी मुंबई टू विजयदुर्ग रो-रो सेवेची बोट मंगळवारी विजयदुर्ग बंदरात सायंकाळी ६ वा. दाखल झाली. या बोटीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी विजयदुर्ग ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी यांनी ही बोट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.सिंधुदुर्गातील महत्त्वाचे बंदर असलेल्या विजयदुर्गमध्ये ही बोट दाखल करून पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.यामुळे लवकरच ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. ही चाचणी यशस्वी झाली असून, हवामान सुरळीत झाले, तर गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी या रो-रो बोटीने मुंबईकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आहे. विजयदुर्ग येथे बंदर जेटीचे काम पूर्ण झालेले असून, मंगळवारी दाखल झालेली रो-रो बोट यशस्वीपणे या जेटीवर लावण्यात आली.
Facebook Comments Box