सावंतवाडी : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील इंद्राली येथील उडुपी रेल्वे स्थानकाचे नामकरण “उडुपी श्री कृष्णा रेल्वे स्टेशन” करण्यासाठी खासदार श्रीनिवास पूजारी यांनी केलेल्या मागणीवर रेल्वे बोर्डाने सकारात्मक पावले उचलली असून, या संदर्भात कोकण रेल्वेला पत्र पाठवले आहे.
मात्र दुसरीकडे, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा होत असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिक व जनमानसांची ठाम मागणी आहे की, सावंतवाडी स्थानकाला परिपूर्ण टर्मिनसचा दर्जा देऊन त्याचे नामकरण “प्रा. मधू दंडवते सावंतवाडी टर्मिनस” असे करण्यात यावे. कोकण रेल्वेच्या स्थापनेत आणि विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दंडवते यांच्या नावाने स्थानकाला नामांकित करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.