पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.
२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.
तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे