खेेड: लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (०१४६३/०१४६४) विशेष गाडी पुजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सव काळात चालविण्याची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. मात्र या गाडीला खेेड स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जल फाउंडेशन कोकण विभागाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव यांनी या संदर्भात निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे. उन्हाळी २०२५ विशेष गाड्यांच्या वेळी खेेड येथे थांबा देण्यात आला होता. मात्र आता तो रद्द करण्यात आला असून त्यामागचे कारण जनतेला समजत नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की, “कोकण रेल्वेकडून महाराष्ट्रातील स्थानकांकडे कायम दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. केरळ व इतर दक्षिणेकडील प्रवाशांच्या मागण्या मान्य करून त्यांना पुरेसे थांबे दिले जातात. पण कोकणवासीयांच्या सोयीसाठी वारंवार दुर्लक्ष केले जाते. हा अन्याय व पक्षपात आहे.”
खेेड हे तालुक्याचे ठिकाण असून हजारो प्रवाशांसाठी ते महत्त्वाचे स्थानक आहे. ही गाडी पुढे नियमित सेवेतही रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना आंदोलन करावे लागू नये म्हणून तातडीने खेेड येथे थांबा निश्चित करणे आवश्यक असल्याची ठाम मागणी जाधव यांनी केली आहे.
अन्यथा हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला जाईल व प्रवाशांना संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.