



गुहागर: चिपळूण महामार्गावरील चिखली येथे सोमवारी दुपारी सुमारास चारच्या दरम्यान अंजनवेल ते रत्नागिरी या मार्गावर मच्छी वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पोचा क्लिनर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनवेलकडून रत्नागिरीच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा चालक चिखली परिसरात वाहनावरील नियंत्रण गमावून बसला आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातामुळे टेम्पोत असलेली मच्छी रस्त्यावर विखुरली गेली, तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. जखमी क्लिनरला स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. नंतर अपघातग्रस्त टेम्पो बाजूला हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.