



मुंबई: मुंबई ते थेट कोकणापर्यंत सागरी वाहतूक सुरू होणार असल्याने कोकणकरांमध्ये या सेवेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई ते कोकण या रो-रो सेवेचा पहिला टप्पा सध्या मुंबई ते मांडवा या मार्गावर सुरू झाला आहे. भाऊचा धक्का येथून या फेरीचं सुटणं होतं. पूर्वीप्रमाणेच जिथं जुन्या रो-रो फेरीचं तिकीट कक्ष होतं, तिथेच या नव्या सेवेसाठीसुद्धा तिकीट मिळत आहे.
‘M2M प्रिन्सेस’ असं या नव्या रो-रो फेरीचं नाव असून, या जहाजात सुमारे 50 कार आणि 30 दुचाकी पार्क करण्याची सोय आहे. ही एक ‘हाय स्पीड क्राफ्ट’ असून तिचा अधिकाधिक वेग 25 ते 30 नॉट्स इतका आहे.
मुंबई ते मांडवा हे सुमारे 10 नॉटिकल मैलांवरचं अंतर ही फेरी साधारण 35 मिनिटांत पार करते. प्रवाशांसाठी फेरीमध्ये विविध श्रेणीतील आसनव्यवस्था असून रिक्लायनर सीट आणि स्कोडा स्लाविया लाऊंजमधील बॅक आणि फूट रिकलायनर सीट्ससारखे आरामदायी पर्यायही उपलब्ध आहेत.
सध्या प्राथमिक स्तरावर मुंबई ते मांडवा या प्रवासाचं तिकीट ५५० प्रति व्यक्ती आहे, तर कोकणापर्यंतच्या प्रवासासाठीचं अपेक्षित तिकीटदर ७००० प्रति व्यक्ती इतका असेल. त्यामुळे मांडवापर्यंतचा प्रवास तुलनेनं अधिक किफायतशीर ठरतो.
दरम्यान, कोकणापर्यंतचा रो-रो प्रवास अद्याप सुरू झालेला नसून, तो पूर्णपणे सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागतील. मात्र, या प्रवासादरम्यान समुद्राच्या विशाल लाटांमधून कोकणात पोहोचण्याचा अनुभव प्रवाशांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.