



Railway Updates: रेल्वेने एसी कोचमधील प्रवास आणखी स्वच्छ आणि आरामदायी करण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. जयपूर-असरवा (अहमदाबाद) ट्रेनमध्ये आता ब्लँकेटसाठी जयपूरची प्रसिद्ध सांगानेरी प्रिंट असलेली कव्हर्स वापरण्यात येणार आहेत. ही कव्हर्स दिसायला आकर्षक असून साफसफाईलाही सोपी आहेत.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या नवीन कव्हरमुळे प्रवाशांच्या ब्लँकेटबाबतच्या तक्रारी कमी होतील आणि प्रवासाचा दर्जाही उंचावेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, “या ब्लँकेट कव्हर सुविधेमुळे प्रवाशी स्वच्छतेबाबत निश्चिंत राहू शकतील.”
सांगानेरी प्रिंटची खासियत म्हणजे ती टिकाऊ, आकर्षक आणि रंग न फिके होणारी असते. अनेक वेळा धुतल्यानंतरही या प्रिंटची सुंदरता टिकून राहते. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी ब्लँकेटचा अनुभव मिळणार आहे.
सध्या ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून ती यशस्वी ठरल्यास देशातील सर्व रेल्वेगाड्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.