Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. १ वरील उघड्या जागेत तसेच शेड परिसरात दुहेरी दिशेच्या मार्गदर्शक प्रदर्शन फलक (सीजेमबीडी) पुरवठा, स्थापित करणे, चाचणी आणि कार्यान्वयनासाठी ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत.
या कामासाठी निविदा क्रमांक KR-RN-S&T-07-2025-26 असून एकूण अनुमानित खर्च 19.84 लाख रुपये (जीएसटीसह) निश्चित करण्यात आला आहे. निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2025, दुपारी 3.00 वाजेपर्यंत आहे.
निविदेसाठी ईएमडी रक्कम 39,700 ठेवण्यात आली असून इच्छुक आणि पात्र ठेकेदारांनी अधिक माहितीसाठी www.ireps.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश
२६ जानेवारी २०२५ च्या रेलरोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील ऑफिसमधे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सावंतवाडी येथे ही डिजिटल कोच इंडिकेटर करिता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणती गाडी प्लॅटफॉर्म ला उभी आहे आणि त्या गाडीतील कोच प्लॅटफॉर्मवर कोणत्या स्थानी लागला आहे हे कळणे आता सुलभ होईल.
हे सर्व कोकणवासीयांचा एकजुटीमुळे शक्य झाले आहे. सावंतवाडी स्थानकातील प्रवासी सुविधांमध्ये वाढ होण्यासाठी प्रथम लिफ्ट आणि आता कोच इंडिकेटर सारखी कामे सावंतवाडी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर १७० मीटरची निवारा शेड देखील होईल हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया संघटनेचे उपाध्यक्ष तथा संपर्कप्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली आहे.


