शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.
वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुलि गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात धैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीची सावट पसरले आहे.


