कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी आमदार संजय पोतनीसांना साकडे; तुतारी एक्स्प्रेसच्या धर्तीवर आणखी गाड्या सुरू करण्याची विनंती.
Follow us onकोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी च्या मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांनी कलिना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी बेस्ट (BEST) अध्यक्ष श्री संजय पोतनीस साहेब यांची भेट घेऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. संघटनेने आमदार साहेबांना दिलेल्या निवेदनात, तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असलेल्या सावंतवाडी येथे प्रस्तावित रेल्वे टर्मिनस कोकणच्या विकासासाठी आणि हजारो कोकणी चाकरमान्यांच्या सोयीसाठी कसे आवश्यक आहे, हे पटवून दिले. आमदार पोतनीस यांनी या मागणीवर सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिली आहे.
मागील १० वर्षांपासून टर्मिनस रखडले
सावंतवाडी स्थानकावर रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी झाले होते. सावंतवाडी हे तळकोकणातील महत्त्वाचे आणि पर्यटन, शिक्षण, व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण शहर आहे. या ठिकाणी टर्मिनस झाल्यास इथून सोडलेल्या गाड्या कोकणातील इतर स्थानकांवर देखील थांबतील आणि कोकणाला मुंबई, पुणे तसेच देशाच्या इतर भागांशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. मात्र, राजकीय अनास्था आणि निधीअभावी हा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रखडल्यामुळे दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसच्या धर्तीवर अजून गाड्या सुरू करण्यावर मर्यादा येत आहेत, असे संघटनेने निवेदनात स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या हितासाठी संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
सावंतवाडी स्टेशनचा टर्मिनस म्हणून विकास
२०१५ मध्ये पायाभरणी झालेल्या टर्मिनस प्रकल्पाचा निधीअभावी रखडलेला दुसरा टप्पा तातडीने पूर्ण करावा. तसेच अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत येथे नवीन प्लॅटफॉर्म, शेल्टर शेड, पाणी, आसन व्यवस्था, पादचारी पुलाचा विस्तार आणि योग्य प्रकाश व्यवस्था करावी.
नवीन रेल्वेगाडी सुरू करावी
तुतारी एक्स्प्रेसच्या धर्तीवर दादर ते सावंतवाडी दरम्यान अजून एक नवी रेल्वेगाडी सुरू करावी.
सीएसएमटी-मंगलोर एक्स्प्रेसला थांबा:
१२१३३/३४ सीएसएमटी मुंबई-मंगलोर-सीएसएमटी मुंबई या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात यावा.
कोकणी चाकरमान्यांची मोठी सोय
सध्या धावणाऱ्या कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी या गाड्या गोव्यातील मडगावपर्यंत धावतात, त्यामुळे तिकिटांचा मोठा कोटा गोव्यातील स्थानकांना मिळतो. गोव्यात पर्यटकांचा भरणा अधिक असल्याने कोकणी चाकरमान्यांना तिकीट मिळणे हा एक जटिल प्रश्न बनला आहे. केवळ सावंतवाडीपर्यंत धावणाऱ्या गाड्या सुरू झाल्यास, सर्व तिकीट कोटा कोकणी जनतेला मिळेल आणि गणेशोत्सव, होळी, उन्हाळी सुट्ट्यांसारख्या सणासुदीच्या काळात हजारो चाकरमान्यांची सोय होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे.
यावेळी संघटनेतर्फे संदीप गुरव, केशव पांचाळ, विलास मोहिते, बाळा मोरे आदी सदस्य उपस्थित होते.


