कोकण रेल्वेवर दिवाणखवटीआणि कळंबणी बुद्रुक दरम्यान घडली घटना
Follow us onमुंबई: ट्रेनमधून पडलेला आपला मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी धोक्याची साखळी (Alarm Chain) खेचणे एका प्रवाशाला चांगलेच अडचणीचे ठरले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गैरवापराबद्दल संबंधित प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३/१०/२०२५ रोजी १२६१८ ह. निजामुद्दीन – एरणाकुलम मंगला एक्स्प्रेसमध्ये दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांदरम्यान घडली. प्रवाशाचा मोबाईल फोन खिडकीतून खाली रुळावर पडला. मोबाईल उचलण्याच्या उद्देशाने त्याने ट्रेनची अलार्म चेन (ACP) खेचली, ज्यामुळे ट्रेन तातडीने थांबली. त्यानंतर तो प्रवासी खाली उतरून रुळावरून फोन घेऊन परत आला.
गुन्हा दाखल
ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या टीटीई श्री पी. एम. कृष्णन आणि श्री अजित जाधव यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली.. त्यांच्या अहवालाच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी भारतीय रेल्वे अधिनियम, १८८९ च्या कलम १४१ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. हे कलम धोक्याची साखळीचा अयोग्य वापर केल्यास दंडनीय कारवाईची तरतूद करते.
कोकण रेल्वेचे आवाहन:
साखळीचा गैरवापर केल्यामुळे रेल्वेच्या वेळेवर आणि सुरळीत संचालनात मोठा अडथळा निर्माण होतो, तसेच इतर प्रवाशांना विनाकारण त्रास होतो. कोकण रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी केवळ वैद्यकीय किंवा गंभीर आपत्कालीन परिस्थितीतच अलार्म चेनचा वापर करावा. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे.


