बदलापूर, १०: मुंबई–कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा मार्ग कल्याणमार्गे सावंतवाडी रोडपर्यंत वाढवण्याची मागणी बदलापूर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाने खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांच्याकडे केली.
या मंडळाच्या प्रतिनिधींनी खासदारांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कल्याण आणि कोकणदरम्यान थेट दैनंदिन रेल्वेसेवेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड–पुणे–पनवेल एक्सप्रेसला कल्याण जंक्शनमार्गे वळवून ती सावंतवाडीपर्यंत वाढवणे अत्यावश्यक आहे. या निर्णयामुळे पुणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेसेवा उपलब्ध होईल.
तसेच सावंतवाडी टर्मिनसचे दुसऱ्या टप्प्याचे काम अपुऱ्या निधीअभावी थांबले असून, ते अमृत भारत स्टेशन योजनाअंतर्गत पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन प्लॅटफॉर्म, शेड, पाण्याची आणि बसण्याची सुविधा तसेच फूटओव्हर ब्रिजचा विस्तार करावा, अशी सूचना देण्यात आली.
![]()


