► खेड (ता.) कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे तालुके पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्याचा आरोप करत अखिल कोंकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांनी मध्य रेल्वेला निवेदन दिले आहे. ०११४१/०११४२ मुंबई-करमळी, ०१४५१/०१४५२ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम उत्तर तसेच भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व हिवाळी विशेष गाड्यांना माणगाव, महाड, खेड, राजापूर, वैभववाडी व सावंतवाडी या तालुक्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणी समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.
अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य…
समितीने नमूद केले आहे की, ख्रिसमस व नवनव्या वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठी वर्दळ असेल. त्याचबरोबर शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण भरलेले असल्याने प्रवाशांची अपेक्षा विशेष गाड्यांवर होती; मात्र महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे समितीने सांगितले.
रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या पट्ट्यात एकाही विशेष गाडीला थांबा नाही. या गाड्या नेमक्या कोणासाठी सोडल्या जातात? असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. तिरअनंतपुरम विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे १५-२० किमी अंतरावर थांबे घेते, परंतु महाराष्ट्र कोकणातील अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे.
त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त
कोकणातील पर्यटक, व्यापारी, शिक्षण आणि रोजगारासाठी हे तालुके महत्त्वाचे असून विशेष गाड्या थांबा नसल्यामुळे स्थानिकांना मोठी गैरसोय होते. अनेकांनी तिकिटे रद्द केली आहेत. समितीने वैयक्तिक राजकारण सोडून, खेडवाडी रोड आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर तातडीने थांबे सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवासी सेवा समिती रेल्वे प्रशासनाकडून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.


