मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शालेय सहलींसाठी फक्त एमएसआरटीसीच्या एसटी (लालपरी) बसचांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी आणि शाळेच्या मालकीच्या बसद्वारे सहली आयोजित करण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
नव्या नियमांनुसार सहलीसाठी शाळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असा प्रमाण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलींच्या गटांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य असेल. तसेच सहलींचे नियोजन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थळांना प्राधान्य देऊन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एमएसआरटीसीकडून दररोज ८०० ते १००० बस २५१ डेपोमधून उपलब्ध करून देण्याची तयारी असून, शालेय सहलींसाठी ५० टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे. सरकारच्या मते या नियमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल अशी अपेक्षा आहे.


