सावंतवाडी टर्मिनस रेल्वे प्रकल्प MITRA च्या नियंत्रणाखाली आणा – रेल्वे प्रवासी समिती

   Follow us on        

सावंतवाडी:

गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या कामाबाबत कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ Maharashtra Institution for Transformation (MITRA) संस्थेच्या नियंत्रणाखाली घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

​रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि ‘वे-साइड’ स्टेशनचा वाद

​पत्रात नमूद केल्यानुसार, कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अलीकडेच “सावंतवाडी हे केवळ एक वे-साइड (Way Side) स्टेशन आहे आणि टर्मिनसचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही” असे विधान केल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट असून, रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप होत आहे.

​प्रवासी आणि चाकरमान्यांचे हाल

​टर्मिनसअभावी कोकणात नवीन गाड्या सुरू करता येत नाहीत. परिणामी, होळी, गणेशोत्सव आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चाकरमान्यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रवाशांचे होणारे हे हाल थांबवण्यासाठी हक्काचे टर्मिनस होणे ही काळाची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे.

​पत्रातील प्रमुख मागण्या आणि मुद्दे:

​प्रकल्प हस्तांतरण: कोकण रेल्वेची अनास्था पाहता, हा प्रकल्प राज्य शासनाच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे किंवा तत्सम सक्षम राज्य अभिकरणाकडे वर्ग करावा.

​टर्मिनस बिल्डिंग व सुविधा: सिंधुरत्न समृद्धी योजनेतून निधी उपलब्ध असतानाही टर्मिनसच्या इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही, ते तातडीने सुरू करावे.

​पाणी पुरवठा: तिलारी धरणातून टर्मिनससाठी पाणी योजनेचा प्रस्ताव राज्य स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहे, त्याला गती द्यावी.

​गाड्यांचे थांबे: कोरोना काळात रद्द केलेले महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे सावंतवाडी स्टेशनवर पुन्हा पूर्ववत करावेत.

​मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची विनंती

​सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते, याची आठवण करून देत संघटनेने या विषयावर तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाला योग्य समज देऊन या प्रकल्पातील अडथळे दूर करावेत, अशी विनंती ॲड. संदीप निंबाळकर आणि संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search