रत्नागिरी:
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणातील पर्यटन व्यवसायावर होणारे विपरीत परिणाम आणि वाढते अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, भाजपा रत्नागिरी जिल्हा सचिव श्री. राजू भाटलेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.
सध्या मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गाच्या दयनीय स्थितीमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटक नाराज असून याचा थेट परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर होत आहे.अनेक स्थानिक पर्यटन व्यावसायिक सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे या निवेदनात नमूद केले आहे.
मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
महामार्गाचे काम तातडीने पूर्ण झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी मिळेल, अशी स्पष्ट भूमिका श्री. भाटलेकर यांनी मांडली. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


