मुंबई: जिथे परराज्यात जाणार्या गाड्यांना मध्य रेल्वे मुंबई भागात हिरवा कंदील देत आहे तिथे कोरोना काळापासून बंद झालेली आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने दिवा स्टेशनवर मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नात आक्रमकपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
रेल्वेचा दुटप्पी कारभार: परराज्यातील गाड्यांना रेड कार्पेट, महाराष्ट्राच्या गाड्यांना बाहेरचा रस्ता!
समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी पत्रात रेल्वेच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. मध्य रेल्वेने ‘मार्गाची क्षमता नाही’ (Line Capacity) असे तांत्रिक कारण देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यातून चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच मार्गावरून दादर-गोरखपूर आणि दादर-बालिया यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर अलीकडेच नव्याने घोषणा करण्यात आलेली एलटीटी बंगळुरू एक्सप्रेस एलटीटी वरून सुटणार आहे. मग महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्यांसाठीच रेल्वेकडे मार्ग उपलब्ध का नाही? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी विचारला आहे.
दिव्यापर्यंत गाडी मर्यादित केल्याने प्रवाशांचे हाल:
वेळेचा अपव्यय: दादरला गाडीत पाणी भरण्याची सोय होती. आता दिव्यात सोय नसल्याने पनवेलला गाडी थांबवून पाणी भरावे लागते, ज्यात ३० ते ४० मिनिटे वाया जात आहेत.
क्षमता असूनही प्रवासी वंचित: दिवा स्थानकातील फलाट आखूड असल्याने या गाड्यांना १७ पेक्षा जास्त डबे लावता येत नाहीत. हीच गाडी दादर किंवा CSMT वरून सुटल्यास २२-२४ डबे लावता येतील, ज्यामुळे दररोज ३ ते ४ हजार अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येईल.
कनेक्टिव्हिटी तुटली: दक्षिण मुंबई, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर हे सर्वात सोयीचे स्थानक होते, जे आता हिरावले गेले आहे.
यापूर्वी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गोपाळ शेट्टी यांसारख्या अनेक नेत्यांनी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने याला केराची टोपली दाखवली आहे. संसदेत आणि विधिमंडळात विषय मांडूनही तो निकाली निघत नसल्याने आता या प्रश्नावर राजकीय लढा उभारण्याची गरज पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण
”कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राचा २२% आर्थिक सहभाग आहे. तरीही मराठी प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या गाडीसाठी झगडावे लागत आहे,” असा आरोप समितीने केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर, मुंबईतील मोठा मतदार असलेल्या कोकणवासीयांचा हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केंद्र सरकारकडे लावून धरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
५०१०४/५०१०३ रत्नागिरी दादर पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत दादर स्थानकावरूनच सुरू करावी आणि डब्यांची संख्या वाढवून कोकणवासीयांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.


