मुंबई: ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गती देत आणि प्रवाशांच्या सोयीत भर घालत मध्य रेल्वेने आता रत्नागिरी (महाराष्ट्र), थिविम (गोवा) आणि उडुपी (कर्नाटक) स्थानकांवर २४ तास ‘डिजी लॉकर’ (डिजिटल स्मार्ट क्लॉक रूम) सुविधा सुरू केली आहे. सुरक्षित आणि स्वयंचलित असलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना आपले सामान रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठेवणे अधिक सोपे झाले आहे.
काय आहे ही ‘डिजी लॉकर’ सुविधा?
मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर आता तिचा विस्तार करण्यात आला आहे. सध्या मध्य रेल्वेकडे एकूण ५६० डिजी लॉकर आहेत (CSMT-३००, दादर-१६०, LTT-१००).
सामान ठेवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे:
१. स्क्रीनवर ‘Start-Store’ वर क्लिक करा.
२. आपले नाव, PNR क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका.
३. लॉकरचा आकार आणि बॅगांची संख्या निवडा.
४. प्रति बॅग ३० रुपये याप्रमाणे मशीनमध्ये पैसे जमा करा.
५. लॉकर उघडेल, त्यात सामान ठेवून दरवाजा बंद करा.
सामान परत मिळवण्यासाठी:
१. स्क्रीनवर ‘Start-Retrieve’ वर क्लिक करा.
२. पावतीवरील बारकोड स्कॅनरला दाखवा.
३. लॉकर उघडेल, आपले सामान घेऊन दरवाजा पुन्हा बंद करा.
प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
ही सुविधा प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ च्या माहितीनुसार या काळात डिजी लॉकर्सच्या माध्यमातून रेल्वेला ३१.६ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता.
पर्यटकांची सोय
आता ही सुविधा कोकणात सुरू केल्याने येथे पर्यटनास येणार्या प्रवाशांची खूप चांगली सोय होईल. जास्त सामान घेऊन फिरणे गैरसोयीचे असल्याने ते डिजी लॉकर मध्ये ठेवता येणार आहे. अशी सुविधा कोकण रेल्वे मार्गावरील ईतर स्थानकावर सुरू करणे गरजचे आहे.


