संगमेश्वर: संगमेश्वर रेल्वे स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या दोन गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील जनतेच्या अडीच वर्षांच्या सातत्यपूर्ण संघर्षाला मोठे यश आले आहे. कोकण रेल्वेच्या पोरबंदर एक्स्प्रेस आणि जामनगर एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना आता संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, शुक्रवारी आणि शनिवारी या गाड्यांचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गुजरातकडे जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक व्यापारी, विद्यार्थी आणि चाकरमान्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. आता थेट प्रवासाची सोय झाल्याने वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे.
जंगी स्वागताची तयारी
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी स्थानिकांनी जय्यत तयारी केली आहे. पोरबंदर एक्सप्रेसचे शुक्रवारी तर जामनगर एक्स्प्रेसचे शनिवारी स्वागत करण्यात येणार आहे. या दोन्ही दिवशी रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी, ढोल-ताशांचा गजरात आणि फुलांच्या हारांनी गाड्यांचे स्वागत केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
फेसबुक ग्रुपचे जाहीर आवाहन
’निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे)’ फेसबुक ग्रुपच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता सर्व नागरिकांनी संगमेश्वर रोड स्थानकावर उपस्थित राहून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे


