सावंतवाडी | प्रतिनिधी: गेल्या दहा वर्षांपासून आपल्या हक्काच्या रेल्वे टर्मिनससाठी संघर्ष करणाऱ्या कोकणी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार कोकण रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करण्याऐवजी, आता चक्क महाराष्ट्राची हक्काची ‘तुतारी एक्सप्रेस’ गोवा राज्यात पळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाचा हा आडमुठेपणा म्हणजे कोकणच्या विकासाला खीळ घालण्याचे एक मोठे षडयंत्र असल्याची संतप्त भावना सध्या तळकोकणात उमटत आहे.
प्रशासनाची ‘टर्मिनस’ टाळण्यासाठी नवी खेळी?
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्थानिक जनता आणि प्रवासी संघटना गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी नवीन तांत्रिक कारणे पुढे करून हे काम रेंगाळत ठेवत आहे. आता तर “टर्मिनस अपूर्ण आहे” असे लंगडे समर्थन देत तुतारी एक्सप्रेस गोव्यापर्यंत नेण्याचा घाट घातला जात आहे. मुळात टर्मिनसचे काम पूर्ण होऊच नये आणि ही गाडी कायमस्वरूपी राज्याबाहेर घालवावी, हीच प्रशासनाची छुपी खेळी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हा केवळ गाडीचा नाही, कोकणच्या अस्मितेचा प्रश्न!
तुतारी एक्सप्रेस ही केवळ एक गाडी नसून ती कोकणी माणसाची जीवनवाहिनी आणि हक्काची एक्सप्रेस आहे. ही गाडी पुढे नेणे म्हणजे सावंतवाडी टर्मिनसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे होय. प्रशासनाचा हा दृष्टिकोन कोकणच्या विकासाला दुय्यम स्थान देणारा असून, स्थानिक जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा आहे.


