संगमेश्वर:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रलंबित कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, याच्या निषेधार्थ रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी संगमेश्वर येथे भव्य रस्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती आणि समस्त कोकणवासीयांच्या वतीने आयोजित हे आंदोलन सकाळी १०:०० वाजता संगमेश्वर डेपो जवळ पार पडणार आहे.
प्रमुख मागण्या:
जनआक्रोश समितीने या आंदोलनाद्वारे प्रशासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या ठेवल्या आहेत:
१. महामार्गासाठी स्वतंत्र तटस्थ समिती स्थापन करून त्यात समितीचे ४ प्रतिनिधी घ्यावेत.
२. कामातील विलंब आणि हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी.
३. महामार्गाच्या उर्वरित कामाची अंतिम मुदत जाहीर करून नियमित प्रगती अहवाल सादर करावा.
४. धोकादायक वळणांवर तात्काळ साईनबोर्ड, लाईट्स आणि रिफ्लेक्टर बसवावेत.
५. संगमेश्वर ब्रिजसह सर्व अपूर्ण पुलांची कामे वेळापत्रकानुसार पूर्ण करावीत.
६. महामार्गावर २४x७ आधुनिक ट्रामा केअर सेंटरची उभारणी करावी.
७. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना योग्य भरपाई आणि जखमींना तात्काळ मदत मिळावी.
८. प्रकल्पासाठी तोडलेल्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे.
कोकणवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन:
”चला संगमेश्वर!” अशी हाक देत समितीने सर्व कोकणवासीयांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महामार्गाच्या दुर्दशेमुळे दररोज होणारे अपघात आणि प्रवासाचा खोळंबा आता सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


