Konkan Railway: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आणि प्रवासाची सोय अधिक सुलभ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मध्य रेल्वेच्या समन्वयाने गाडी संख्या ०२१९८ / ०२१९७ जबलपूर – कोइम्बतूर – जबलपूर साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या सेवा विस्तारित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एक दोन नाही तर तब्बल पाच वर्षासाठी या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, गाडी संख्या ०२१९८ जबलपूर – कोइम्बतूर साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्या ६ मार्च २०२६ पासून २७ डिसेंबर २०३० पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच, परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०२१९७ कोइम्बतूर – जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ९ मार्च २०२६ पासून ३० डिसेंबर २०३० पर्यंत धावणार आहे. म्हणजे पुढील पाच वर्षे ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.
या गाडीचे प्रमुख थांबे:
ही गाडी आपल्या प्रवासात नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खंडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मूकंबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, वडाकरा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना (Coach Composition):
या विशेष गाडीला एकूण २४ डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम श्रेणी ए.सी. (First AC) चा १ डबा, द्वितीय श्रेणी ए.सी. (Two Tier AC) चे २ डबे, तृतीय श्रेणी ए.सी. (3 Tier AC) चे ६ डबे, स्लीपर क्लासचे ११ डबे, जनरलचे २ डबे आणि २ एस.एल.आर. (SLR) डब्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या ट्रेनच्या धावण्याचे दिवस, वेळ, थांबे आणि डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; ती पूर्वीप्रमाणेच नियमितपणे धावत राहील. या विस्तारामुळे कोकणात आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी पाच वर्षांसाठी प्रवासाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. या गाड्यांच्या थांब्यांच्या आणि वेळेच्या सविस्तर माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


