मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘महाराष्ट्र मोफत लॅपटॉप योजना २०२६’ बाबत एक संदेश वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, राज्य सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा पूर्णपणे बनावट (False) असल्याचे जाहीर केले आहे.
नेमका प्रकार काय?
व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एका बातमीचा स्क्रीनशॉट फिरत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की महाराष्ट्र सरकार २०२६ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप करत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकही देण्यात आली आहे. या पोस्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
DGIPR कडून खुलासा
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) या बातमीचे खंडन केले आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती देताना त्यांनी खालील मुद्दे स्पष्ट केले आहेत:
अधिकृत घोषणा नाही: शासनाने अशी कोणतीही ‘मोफत लॅपटॉप योजना’ जाहीर केलेली नाही.
GR चा अभाव: या योजनेबाबत कोणताही शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत अधिसूचना निर्गमित झालेली नाही.
सायबर सुरक्षेचा धोका: व्हायरल पोस्टमध्ये दिलेली लिंक संशयास्पद असून ती युझर्सला ‘ब्रोकन’ किंवा चुकीच्या वेबपेजवर घेऊन जाते. अशा लिंक्सचा वापर तुमची वैयक्तिक माहिती (Personal Data) चोरण्यासाठी केला जाऊ शकतो.
नागरिकांना आवाहन
अशा प्रकारच्या ‘क्लिकबेट’ स्वरूपाच्या अफवांना बळी पडू नका. कोणत्याही सरकारी योजनेची खातरजमा करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच, आपली वैयक्तिक माहिती अनोळखी लिंकवर शेअर करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी ‘फ्री लॅपटॉप योजना २०२६’ सुरू केल्याचा दावा करण्यात येत आहे.#FactCheck#DGIPRFactCheck
अशी कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली नाही. या दाव्याशी संबंधित कोणताही शासकीय निर्णय (GR) किंवा… pic.twitter.com/MQwAYbmBw6
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 16, 2026


