दोडामार्ग: सह्याद्रीच्या रांगांमधील समृद्ध निसर्ग आणि गावे वाचवण्यासाठी स्थानिकांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून, दिल्ली लॉबीच्या रूपाने जमिनी खरेदी करण्यासाठी येणारे गुंतवणूकदार म्हणजे या भागाला लागलेली ‘कीड’ आहे, असे परखड मत वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलीन दयानंद यांनी कोलझर येथे व्यक्त केले. “रक्ताच्या नात्याबाहेर कोणालाही जमीन विकणार नाही” अशी शपथ घेत कोलझरवासियांनी पुकारलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, हा परिसर व्याघ्र कॉरिडॉर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने त्याचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी स्थानिकांचीच आहे. ही मोठी आर्थिक लॉबी येथील गावपण आणि पर्यावरण नष्ट करण्यास टपली आहे, त्यामुळे स्थानिकांनी वेळीच सावध होऊन ही कीड उपटून फेकली पाहिजे.
या लढ्यात तरुणांच्या असलेल्या मोठ्या सहभागाचे कौतुक करताना स्टॅलीन म्हणाले की, नव्या पिढीने घेतलेला हा निर्णय आदर्शवत आहे. जमिनी विकून मिळणारा पैसा फार काळ टिकणार नाही, मात्र येथील निर्मळ जल आणि समृद्ध निसर्ग भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना अधिक श्रीमंत करू शकतो. रेडी येथील उत्खननामुळे झालेल्या दुरवस्थेचा दाखला देत त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, इको-सेन्सिटिव्ह क्षेत्राबाबत लोकांमध्ये पसरवले जाणारे गैरसमज चुकीचे असून स्थानिकांच्या निसर्गपूरक जीवनशैलीला त्यापासून कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड आणि खनिजयुक्त मातीच्या उत्खननाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, ही गंभीर परिस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.
यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत यांनी व्याघ्र कॉरिडॉरमधील गावांची समन्वय समिती स्थापन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. पी. देसाई, कुंब्रलचे माजी सरपंच प्रवीण देसाई, सुदेश देसाई, सिद्धेश देसाई यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


